ASTROSAT – Marathi FAQ

अॅस्ट्रोसॅट विषयी कायम विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

(उत्तरे खाली बघा, अधिक माहिती इथे मिळवा)

विविध तरंगलांबीमध्ये निरीक्षणे घेऊ शकणारा भारताचा पहिला उपग्रह ‘अॅस्ट्रोसॅट’ हा २८ सप्टेंबर रोजी ISRO द्वारे अंतराळात प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. एकाच रचनेमध्ये पाच निरनिराळ्या दुर्बिणी असलेला हा उपग्रह पुढे सर्वांना वापरासाठी खुला होणार आहे. न्यूट्रॉन तारे, कृष्णविवरे, उच्च घनतेचे पदार्थ, ताऱ्यांचा जन्म तसेच विश्वातील मूळ बले यांविषयीच्या मूलभूत प्रश्नांची उकल करणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या सर्वांबद्दल आपल्या मनात येणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पुढे दिली आहेत.

१. अॅस्ट्रोसॅट हा विविध तरंगलांबीमध्ये निरीक्षणे घेण्यासाठी का बनवण्यात आला आहे?
२. अॅस्ट्रोसॅटला अंतराळात असण्याची गरज का आहे?
३. या मोहिमेचा कालावधी किती असणार आहे?
४. अॅस्ट्रोसॅटचा आकार आणि वजन किती आहे?
५. अॅस्ट्रोसॅटला ऊर्जा कोठून मिळणार आहे?
६. अॅस्ट्रोसॅटच्या प्रक्षेपणासाठी कोणते रॉकेट वापरण्यात येणार आहे?
७. अॅस्ट्रोसॅटची कक्षा कशी असणार आहे?
८. अॅस्ट्रोसॅट आपले लक्ष्य कसे निश्चित करेल?
९. अंतराळातील निरनिराळ्या वस्तूंना लक्ष्य करणे अॅस्ट्रोसॅटला कसे साधेल?
१०. अॅस्ट्रोसॅटकडून आपल्याला माहिती कशा प्रकारे मिळेल?
११. ही भारताची पहिलीच अंतराळ दुर्बीण आहे का?
१२. अॅस्ट्रोसॅटला किती खर्च आला आहे?
१३. इतर दुर्बिणींच्या तुलनेत अॅस्ट्रोसॅटचे स्थान काय आहे?
१४. अॅस्ट्रोसॅट हा कोणत्या प्रकारच्या वस्तू/घटना यांचे निरीक्षण घेणार आहे?
१५. या वस्तू/घटना यांच्याबद्दल अॅस्ट्रोसॅट कोणती नवीन माहिती पुरवू शकेल?
१६. अॅस्ट्रोसॅटच्या मदतीने कृष्णविवरे दिसू शकतील का?
१७. अॅस्ट्रोसॅटमध्ये कोणकोणती उपकरणे असणार आहेत?
१८. अॅस्ट्रोसॅटच्या निर्मितीमध्ये कोणकोणत्या संस्थांचा सहभाग आहे?
१९. अॅस्ट्रोसॅटची रचना निश्चित करताना कोणकोणती आव्हाने समोर होती?
२०. अॅस्ट्रोसॅटचा वापर कोणकोण करू शकेल?
२१. मी स्वतः अॅस्ट्रोसॅटचा वापर करू शकतो का?
२२. अॅस्ट्रोसॅटकडून मिळालेली माहिती आणि छायाचित्रे कोठे पहावयास मिळतील?
२३. अॅस्ट्रोसॅटचा इतर भारतीय दुर्बिणींशी काही संबंध असणार आहे का?
२४. भारतासारख्या विकसनशील देशाने अंतराळ दुर्बिणींमध्ये मोठी गुंतवणूक करणे का आवश्यक आहे?
२५. शालेय विज्ञान शिक्षणासाठी अॅस्ट्रोसॅटचा लाभ कसा होणार आहे?

 

१. अॅस्ट्रोसॅट हा विविध तरंगलांबीमध्ये निरीक्षणे घेण्यासाठी का बनवण्यात आला आहे?

– अशी कल्पना करा की मानवी शरीराला स्पर्श न करता केवळ त्यापासून येणाऱ्या प्रारणाच्या मदतीने आपण त्याची रचना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. दृश्य प्रकाशातून आपल्याला त्वचेबद्दल माहिती मिळेल. तसेच, अवरक्त किरणे ही रक्तवाहिन्या व तपमानाबद्दल, अतिनील किरणे ऊतींबद्दल आणि क्ष-किरणांमधल्या सावल्या या हाडांची वैशिष्ट्ये दर्शवतील. मानवी शरीराची अचूक कल्पना येण्यासाठी ही सर्व प्रकारची माहिती मिळणे आवश्यक आहे.
खोल अवकाशातील वस्तूंबद्दल माहिती मिळण्याचा एकमेव स्रोत म्हणजे त्यांपासून आपल्यापर्यंत पोहोचणारा प्रकाश होय. अवकाशातील वस्तू या रेडिओ आणि मायक्रोवेव्ह पासून दृश्य व अतिनील तसेच क्ष-किरण व गॅमा किरण अशा सर्व तरंगलांबीमध्ये प्रकाश उत्सर्जित करतात. विविध तरंगलांबीमधील प्रकाश हा वस्तूमधील विविध भौतिक प्रक्रियांमधून निर्माण होत असतो आणि संपूर्ण वर्णपटाच्या अभ्यासानंतरच त्या वस्तूबद्दल काही निश्चित अंदाज करता येतो. तसेच क्ष-किरण व गॅमा किरणांमध्ये दिसणारे आकाश हे फारच परिवर्तनशील असते आणि त्यात सतत बदल होत असतात. त्यामुळे संपूर्ण वर्णपटाचे निरीक्षण एकाच वेळी करण्याच्या क्षमतेला फार महत्त्व आहे. अॅस्ट्रोसॅटची खासियत म्हणजे तो विश्वाचे निरीक्षण हे ‘नीअर आणि फार-अल्ट्राव्हायोलेट, सॉफ्ट आणि हार्ड एक्स-रे’ या सर्वांमध्ये आणि विशेष म्हणजे एकाच वेळी घेऊ शकतो.

२. अॅस्ट्रोसॅटला अंतराळात असण्याची गरज का आहे?

– पृथ्वीवर जीवसृष्टी टिकून राहण्याच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे आपले संरक्षक कवच – आपले वातावरण! अंतराळातील अतिनील किरणे, क्ष-किरणे आणि गॅमा किरणे (तसेच अवरक्त किरणे आणि मायक्रोवेव्ह यांचा काही भाग) वातावरणाचे हे कवच भेदू शकत नाहीत. हे एका दृष्टीने आपल्या फायद्याचे आहे, कारण सजीवांच्या पेशींना ही किरणे घातक असतात. केवळ दृश्य प्रकाश आणि रेडिओलहरीच वातावरण ओलांडून पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतात.
त्यामुळे आपल्याला अवकाशातील स्रोतांमधून येणाऱ्या अतिनील आणि क्ष-किरणांच्या रूपातील प्रारणांचे निरीक्षण घ्यायचे असल्यास अशी दुर्बीण अंतराळात सोडणे आवश्यक आहे. म्हणूनच अॅस्ट्रोसॅट ही एक अंतराळ दुर्बीण आहे आणि ISRO च्या PSLV या रॉकेटच्या मदतीने ती अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

३. या मोहिमेचा कालावधी किती असणार आहे?

– ही मोहीम किमान ५ वर्षे चालेल अशी अपेक्षा आहे. वायुगळती आणि उपकरणांमध्ये येणारी अशुद्धता यातून टिकून राहिल्यास अॅस्ट्रोसॅट हा ५ वर्षांनंतरही कार्यरत राहू शकेल, परंतु किमान कालावधीचे लक्ष्य हे ५ वर्षांचे असेल.

४. अॅस्ट्रोसॅटचा आकार आणि वजन किती आहे?

– उपग्रहाचे वजन १५१५ किलोग्रॅम, म्हणजे साधारणपणे एखाद्या कारइतके आहे. त्याची उंची ६ मीटर असून सौरपट्टिकांची पूर्ण पसरल्यानंतरची लांबी ७ मीटर इतकी असेल.

५. अॅस्ट्रोसॅटला ऊर्जा कोठून मिळणार आहे?

– अॅस्ट्रोसॅटमध्ये दोन्ही बाजूंस असलेल्या प्रत्येकी २ सौरपट्टिका फोटो-इलेक्ट्रिक परिणामाचा वापर करून सूर्यप्रकाशाचे रुपांतर विजेत करतील. त्यातून एकूण १.६ किलोवॉट इतकी शक्ती मिळेल. या सौरपट्टिकांद्वारे चार्ज केल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीज् मधून उपग्रहाला ऊर्जा मिळेल.

६. अॅस्ट्रोसॅटच्या प्रक्षेपणासाठी कोणते रॉकेट वापरण्यात येणार आहे?

– पोलर सॅटेलाइट लाँच वेहिकल (PSLV) च्या XL संस्करणाच्या मदतीने अॅस्ट्रोसॅट हा पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यात येईल. खरंतर खास खगोलशास्त्रीय उपग्रह प्रक्षेपित करण्याची ही ISRO ची पहिलीच वेळ आहे!
लाँच वेहिकलला चार चरण आणि सहा स्ट्रॅप-ऑन मोटर्स आहेत. या PSLV-C30 चे प्रक्षेपणाच्या वेळचे वजन ३२० टन आणि उंची १५ मजल्यांइतकी असेल!
PSLV चे हे ३१वे प्रक्षेपण २८ सप्टेंबर २०१५ रोजी सकाळी १०:०० वाजता होईल आणि केवळ २३ मिनिटांतच हे रॉकेट अॅस्ट्रोसॅटला त्याच्या कक्षेत स्थापित करेल.

७. अॅस्ट्रोसॅटची कक्षा कशी असणार आहे?

– अॅस्ट्रोसॅट पृथ्वीभोवती साधारण विषुववृत्तीय कक्षेत सुमारे ६५० किमी उंचीवर फिरेल. विषुववृत्ताशी केवळ ६ अंशांचा कोन असल्याने अॅस्ट्रोसॅटची कक्षा विषुववृत्ताला समांतरच म्हणता येईल. दर ९७ मिनिटांनी या उपग्रहाची एक पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण होईल.

८. अॅस्ट्रोसॅट आपले लक्ष्य कसे निश्चित करेल?

– अॅस्ट्रोसॅटसारखा उपग्रह म्हणजे एक अतिशय मौल्यवान साधन असल्याने त्याच्या कार्यकाळाचा एखादा सेकंददेखील वाया घालवणे परवडणारे नाही. खगोलनिरीक्षकांच्या मंजूर झालेल्या ठरावांनुसार भरपूर आधीपासूनच एक वेळापत्रक आखण्यात येईल. अॅस्ट्रोसॅटच्या कक्षेतील स्थितीनुसार त्या त्या वेळचे सूर्य आणि पृथ्वी यांचे स्थान त्या वेळापत्रकात विचारात घेतलेले असेल. अंतिम वेळापत्रक तयार झाल्यानंतर, कोणत्या वेळी कोणत्या लक्ष्याकडे दिशा वळवायची आहे याबद्दलचे आदेश अॅस्ट्रोसॅटमध्ये अपलोड करण्यात येतील.

९. अंतराळातील निरनिराळ्या वस्तूंना लक्ष्य करणे अॅस्ट्रोसॅटला कसे साधेल?

– इतर बहुतांश उपग्रहांप्रमाणेच, ताऱ्यांच्या स्थानानुसार दिशासातत्य राखण्यासाठी अॅस्ट्रोसॅटमध्ये एक जायरोस्कोप (gyroscope) बसवण्यात आला आहे. तसेच एका ‘फ्लायव्हील’द्वारे कोनीय गतिज ऊर्जा साठवली जाईल. मोटर्सच्या मदतीने हे फ्लायव्हील प्रचंड वेगाने फिरवले जाईल. जेव्हा अॅस्ट्रोसॅटला एखाद्या लक्ष्याकडे रोखण्यासाठी दिशा बदलायची असेल तेव्हा ही साठवलेली ऊर्जा उपग्रहाला कोनीय गती देण्यासाठी उपयोगात आणली जाईल.

१०. अॅस्ट्रोसॅटकडून आपल्याला माहिती कशा प्रकारे मिळेल?

– अॅस्ट्रोसॅटवर बसवलेल्या एका अँटेनामार्फत पृथ्वीकडे माहिती प्रक्षेपित केली जाईल. X बँड (सुमारे ८ गीगाहर्ट्झ) मध्ये कार्य करणारी ही अँटेना १०५ मेगाबिट्स प्रतिसेकंद इतक्या वेगाने माहिती पाठवू शकते. ISRO ची एक खास अँटेना बेंगळुरु जवळ ब्यालालू येथे आहे. जेव्हा जेव्हा अॅस्ट्रोसॅट ब्यालालूच्या आकाशातून प्रवास करेल, तेव्हा तेव्हा त्याने पाठवलेली वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी माहिती या अँटेनाद्वारे ग्रहण केली जाईल आणि ती इंडियन स्पेस सायन्स डेटा सेंटर (ISSDC) येथे साठवली जाईल. अॅस्ट्रोसॅट हा प्रत्येक पृथ्वीप्रदक्षिणेदरम्यान ब्यालालूमधून केवळ काही मिनिटेच दिसू शकेल. आवश्यक ती सर्व माहिती डाउनलोड करणे आणि नवीन आदेश अपलोड करणे हे कार्य केवळ त्या काही मिनिटांतच संपवण्याचे आव्हान असेल!
आंतरग्रहीय मोहिमांसाठी वापरण्यात येणारे इंडियन डीप स्पेस नेटवर्क (IDSN) हेदेखील ब्यालालू येथे आहे.

११. ही भारताची पहिलीच अंतराळ दुर्बीण आहे का?

– नक्कीच नाही. गॅसचे फुगे आणि साऊंडिंग रॉकेट्स यांच्या प्रक्षेपणाने भारतात उच्च ऊर्जा खगोलविज्ञानाची सुरुवात झाली. अगदी भारताच्या पहिल्यावहिल्या उपग्रहावर, म्हणजे १९७५ साली प्रक्षेपित करण्यात आलेल्या ‘आर्यभट’वर देखील क्ष-किरणांसाठी एक उपकरण होते. त्यापुढचा प्रयोग १९९४ मध्ये SROSS-C2 या उपग्रहावर बसवण्यात आलेला गॅमा रे बर्स्ट (GRB) डिटेक्टर हा होता. पुढे १९९६ मध्ये झालेला इंडियन एक्स-रे अॅस्ट्रॉनॉमी एक्सपेरिमेंट (IXAE) हा IRS-P3 उपग्रहाचा भाग होता.
या मोहिमांमधील यश आणि अनुभव यांच्या बळावर भारतीय समुदायात, खगोलविज्ञानासाठी एक खास उपग्रह सोडण्याविषयीचा प्रस्ताव मांडण्यात आला.

१२. अॅस्ट्रोसॅटला किती खर्च आला आहे?

– उपग्रह आणि उपकरणे यांच्या विकासासाठी सुमारे ₹ १७८ कोटी (प्रक्षेपण खर्च वगळून) इतका खर्च आला.

१३. इतर दुर्बिणींच्या तुलनेत अॅस्ट्रोसॅटचे स्थान काय आहे?

– आत्तापर्यंतच्या विविध आंतरराष्ट्रीय उपग्रहांच्या तुलनेत अॅस्ट्रोसॅटकडे काही वैशिष्ट्यपूर्ण क्षमता आहेत. UVIT चे अर्ध्या अंशाच्या फील्ड ऑफ व्ह्यू (FOV) मधले रेझोल्युशन हे १.८ कोनीय सेकंदांपेक्षाही कमी आहे. त्याचे रेझोल्युशन आणि संवेदनक्षमता (sensitivity) ही GALEX पेक्षा चांगली आहे. तसेच त्याचे फील्ड ऑफ व्ह्यू (FOV) हे हबल स्पेस टेलिस्कोपवरील अतिनील उपकरणांच्या तुलनेत खूप जास्त आहे. ८००० वर्ग सेंमी इतक्या प्रभावाचे क्षेत्रफळ असलेला LAXPC हा आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा प्रपोर्शनल काउंटर आहे. ३ keV पेक्षा जास्त ऊर्जेच्या क्ष-किरणांमधील घटना टिपण्याची त्याची ‘टायमिंग’ क्षमतादेखील १० मायक्रोसेकंद इतकी विलक्षण आहे.
अॅस्ट्रोसॅटची एक अत्यंत महत्त्वाची क्षमता म्हणजे सर्वच (अतिनील पासून ते हार्ड एक्स-रे पर्यंत) उपकरणे स्वतंत्र फोटॉन्स ग्रहण करू शकतात आणि केवळ एवढेच नव्हे तर प्रत्येक क्ष-किरण घटनेतील प्रत्येक फोटॉनच्या ऊर्जेचे आणि त्याच्या आगमनाच्या वेळेचे अचूक मापन करू शकतात.

१४. अॅस्ट्रोसॅट हा कोणत्या प्रकारच्या वस्तू/घटना यांचे निरीक्षण घेणार आहे?

– अतिनील आणि क्ष-किरण प्रारणे उत्सर्जित करणाऱ्या कोणत्याही खगोलीय वस्तूचे निरीक्षण अॅस्ट्रोसॅट घेऊ शकतो. ही उच्च ऊर्जेची प्रारणे प्रचंड उलथापालथ होत असलेल्या वस्तूंकडून येतात आणि ती रेडिओ किंवा दृश्य प्रारणांपेक्षा खूप निराळी असतात. तप्त असे युवा तारे आणि उच्च घनतेचे श्वेतबटू हे अतिनील प्रारणांमध्ये तेजस्वी दिसतात. त्यातील काही दशसहस्र केल्व्हिन्स इतक्या तपमानापर्यंत तापलेल्या वायूच्या वर्णपटीय रेषादेखील याच पट्टीत मोडतात (उदा. प्लॅनेटरी नेब्युले). दीर्घिकापुंजाच्या गुरुत्वाकर्षणात खेचला गेलेला काही दशलक्ष अंश सेल्सिअस तपमानाचा वायू क्ष-किरणे उत्सर्जित करतो. परंतु, अॅस्ट्रोसॅटची क्ष-किरण उपकरणे ही न्यूट्रॉन तारे आणि कृष्णविवरे यांसारख्या खास वस्तूंच्या निरीक्षणासाठी वापरली जातील. अशा काही उच्च घनतेच्या वस्तू त्यांच्या प्रचंड गुरुत्वबलाने जोडीदार ताऱ्यामधून किंवा ताऱ्यांच्या दरम्यान असलेल्या वायूमधून पदार्थ खेचून घेतात. सर्पिलाकार कक्षेत हा पदार्थ त्या वस्तूंकडे खेचला जाताना तो तापतो आणि क्ष-किरणे उत्सर्जित करतो. या प्रारणांमध्ये काळानुसार खूप बदल होतात. अशा विचित्र स्रोतांमध्ये नेमके काय घडते हे जाणून घेण्यासाठी अॅस्ट्रोसॅटचा वापर केला जाईल.

१५. या वस्तू/घटना यांच्याबद्दल अॅस्ट्रोसॅट कोणती नवीन माहिती पुरवू शकेल?

– या वस्तूंबद्दल अॅस्ट्रोसॅटने पुरवलेल्या माहितीच्या आधारे काही मूलभूत प्रश्नांची उकल होण्यास मदत होईल. प्रचंड वस्तुमानाच्या ताऱ्यांचा जन्म आणि त्यांची दीर्घिकांमधील उत्क्रांती तसेच आपल्या आकाशगंगेतील ताऱ्यांच्या दरम्यान असलेल्या धुळीचां प्रकार आणि विस्तार यांबद्दल अतिनील किरणांच्या माहितीमधून कळेल. अचानक तेजस्वी होणारे आणि लगेच मंदावणारे काही स्रोत (ट्रान्झियंट्स) हे अभ्यासाचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. यांतील काही गॅमा रे बर्स्ट (GRB) असतात परंतु काहींचा उगम अजून ज्ञात नाही. विविध तरंगलांबीमध्ये न्यूट्रॉन ताऱ्यांची निरीक्षणे घेऊन त्यांचे वस्तुमान आणि त्रिज्या मोजता येते. उच्च घनतेच्या या ताऱ्यांच्या पोटातील पदार्थ कोणत्या अवस्थेत आहे हे रहस्य केवळ अशा मापानातूनच उलगडू शकते. अतिवेगात परिवलन करणाऱ्या न्यूट्रॉन ताऱ्यांच्या वर्णपटीय वैशिष्ट्यांमधून, विश्वात सर्वात शक्तिशाली असलेल्या त्यांच्या चुंबकीय क्षेत्रांबद्दल अधिक जाणता येईल. प्रारणांचे झोत फेकणाऱ्या कृष्णविवरांच्या वर्णपटांमधून तसेच निरनिराळ्या तरंगलांबीमधील निरीक्षणांत दिसणाऱ्या फरकांमधून हे समजेल की कृष्णविवरांभोवती पदार्थ नेमका कसा गोळा होतो आणि हे झोत निर्माण कसे होतात. या सगळ्यातून व्यापक सापेक्षता सिद्धांताचेदेखील परीक्षण होईल. त्याचप्रमाणे अॅक्टिव्ह गॅलॅक्टिक न्यूक्लिआय (AGN) यांच्यात विविध तरंगलांबीमध्ये दिसणाऱ्या फरकांमधून हे कळेल की गोळा होणाऱ्या पदार्थाच्या चकतीचे स्वरूप कसे आहे.

१६. अॅस्ट्रोसॅटच्या मदतीने कृष्णविवरे दिसू शकतील का?

– एका अर्थी हो! कृष्णविवरांचे गुरुत्वबल इतके प्रचंड असते की प्रकाशसुद्धा त्यांच्यापासून बाहेर पडू शकत नाही, त्यामुळे प्रत्यक्ष कृष्णविवरे दिसू शकत नाहीत. मग ती कुठे आहेत हे आपल्याला कसे कळते? ती त्यांच्या परिसरावर जो प्रभाव टाकतात त्यावरून आपण त्यांचा शोध घेतो.
कृष्णविवरांजवळचा पदार्थ त्यांच्याकडे खेचला जातो, परंतु तो सहजासहजी थेट केंद्रात पडत नाही. उलट तो सर्पिलाकार कक्षेत फिरत फिरत केंद्राकडे जातो आणि त्यामुळे एक पसरट चकती तयार होते. या चकतीचा कोनीय प्रवेग हळूहळू कमी होतो, त्यातील वायू प्रचंड तापतो आणि जवळजवळ प्रत्येक तरंगलांबीमध्ये प्रारणे फेकतो. आपण याच प्रारणांच्या आधारे कृष्णविवरांच्या अस्तित्वाबद्दलचा निष्कर्ष काढतो.

१७. अॅस्ट्रोसॅटमध्ये कोणकोणती उपकरणे असणार आहेत?

– अॅस्ट्रोसॅटमध्ये एकूण पाच उपकरणे (किंवा दुर्बिणी) आहेत.

  • UVIT: Ultra-Violet Imaging Telescope
  • LAXPC: Large Area X-ray Proportional Counter
  • SXT: Soft X-ray Telescope
  • CZTI: Cadmium-Zinc-Telluride Imager
  • SSM: Scanning Sky Monitor

यांपैकी UVIT, LAXPC, SXT and CZTI हे को-अलाईन्ड असल्याने एका वेळी आकाशाच्या एकाच भागाकडे रोखलेले असतील. UVIT हा एकाच वेळी नीअर (२००-३०० नॅमी) आणि फार-अल्ट्राव्हायोलेट (१३०-१८० नॅमी) आणि दृश्य प्रकाशात निरीक्षणे घेईल, SXT हा ०.३ – ८ keV मधील फोकसिंग टेलिस्कोप आहे LAXPC हा ३ – ८० keV मध्ये आणि CZT १० – १०० keV मध्ये कार्य करेल.

SSM मध्ये सतत आकाशाची टेहळणी करणारे तीन लहान पोझिशन सेन्सिटिव्ह एक्स-रे डिटेक्टर्स आहेत जे अचानक तेजस्वी झालेल्या स्रोतांचा शोध घेतील ज्यायोगे बाकी चार महत्त्वाच्या उपकरणांना त्या दिशेने रोखून निरीक्षण घेता येईल.

१८. अॅस्ट्रोसॅटच्या निर्मितीमध्ये कोणकोणत्या संस्थांचा सहभाग आहे?

– भारतातील काही नामवंत संस्थांनी एकत्रितपणे कार्य करून अॅस्ट्रोसॅटची निर्मिती केली आहे.

  • बेंगळुरूमधील ISRO Satellite Centre (ISAC),
  • मुंबईतील Tata Institute of Fundamental Research (TIFR),
  • बेंगळुरूमधील Indian Institute of Astrophysics (IIA) आणि Raman Research Institute (RRI),
  • पुण्यातील Inter University Centre for Astronomy and Astrophysics (IUCAA) आणि National Centre for Radio Astrophysics
  • (NCRA-TIFR) तसेच
  • अहमदाबादेतील Physical Research laboratory (PRL)

या संस्थांवर अॅस्ट्रोसॅटच्या उपकरण विकास आणि वैज्ञानिक माहितीच्या विश्लेषणाची जबाबदारी होती. तसेच SXT हा लेस्टर विद्यापीठ यांच्याबरोबर आणि UVIT हा कनेडियन स्पेस एजन्सी यांच्याबरोबर संयुक्तपणे बनवण्यात आला. उपग्रह बांधणी आणि खुद्द रॉकेट हे मात्र ISRO ने च निर्माण केले आहेत.

१९. अॅस्ट्रोसॅटची रचना निश्चित करताना कोणकोणती आव्हाने समोर होती?

– अॅस्ट्रोसॅट ही भारताची पहिलीच मोठी अंतराळ वेधशाळा आहे आणि त्यामुळे या प्रकल्पात काही आव्हाने होती. SXT हा भारतात तयार करण्यात आलेला क्ष-किरणांसाठीचा पहिलाच फोकसिंग इमेजर आहे. अत्यंत अचूक टायमिंग क्षमतेचा LAXPC हा जगातील सर्वांत मोठ्या प्रपोर्शनल काउंटर्स पैकी एक आहे. अशुद्धतेचा शिरकाव होऊ नये म्हणून UVIT ची निर्मिती ही कमालीच्या शुध्द आणि स्वच्छ वातावरणात करण्यात आली. प्रत्येकच उपकरणातील काही ना काही रचना आणि निर्मिती ही भारतीय शास्त्रज्ञांनी या वेळी प्रथमच केली असल्याने अॅस्ट्रोसॅट प्रकल्पाने भारतीय खगोलविज्ञानाच्या उपकरणशास्त्रामध्ये एक नवीनच पायंडा पाडला आहे!

२०. अॅस्ट्रोसॅटचा वापर कोणकोण करू शकेल?

– अॅस्ट्रोसॅट ही एक खुली वेधशाळा असल्याने भारतातील किंवा बाहेरील कोणताही संबंधित संशोधक तिचा वापर करू शकतो. प्रक्षेपणानंतरचे पहिले ६ महिने हे सर्व प्रणालींच्या व्यापक चाचण्यांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. विविध उपकरणे बनवणाऱ्या चमूंना निरीक्षणे घेता यावीत यासाठी पुढील ६ महिने राखीव आहेत. परंतु, १ वर्षानंतर मात्र त्याच्या वेळेचा ठराविक अंश हा ज्या भारतीय संशोधकांचे प्रस्ताव मजूर झाले आहेत अशांसाठी ठेवला जाईल. दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय संशोधकही अर्ज करू शकतील.
त्याचप्रमाणे अॅस्ट्रोसॅटने घेतलेली सर्व निरीक्षणे ही काही ठराविक काळानंतर सर्वांसाठीच खुली केली जातील!

२१. मी स्वतः अॅस्ट्रोसॅटचा वापर करू शकतो का?

– हो. प्रक्षेपणानंतर एक वर्षाने, भारतीय संशोधकांसाठी राखीव असलेल्या वेळासाठी प्रस्ताव वेळोवेळी मागवले जातील. वैज्ञानिकदृष्ट्या उत्तम कल्पना आणि निरीक्षणासाठीची योजना तयार असलेला कोणीही त्यासाठी अर्ज करू शकतो. आपले प्रस्ताव हे एका तज्ञ समितीकडून तपासले जातील आणि निवड झाल्यास आपल्याला अॅस्ट्रोसॅट वापरून निरीक्षण करण्यासाठी वेळ दिली जाईल!
परंतु, अॅस्ट्रोसॅटचा वेळ बहुमूल्य असल्याने केवळ अशाच प्रस्तावांना मंजुरी मिळेल जे वैज्ञानिकदृष्ट्या प्रभावी वाटतील आणि अॅस्ट्रोसॅटच्या वेळेचा कार्यक्षमपणे वापर करू शकतील. महाविद्यालये आणि विद्यापीठे यांतील विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग हे अॅस्ट्रोसॅटचे वापरकर्ते व्हावेत यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जात आहेत. इच्छुक वापरकर्त्यांचा वैज्ञानिक पाया बळकट होण्यासाठी असे वर्ग फारच महत्त्वाचे ठरणार आहेत.

२२. अॅस्ट्रोसॅटकडून मिळालेली माहिती आणि छायाचित्रे कोठे पहावयास मिळतील?

– अॅस्ट्रोसॅटकडून मिळालेली सर्व माहिती इंडियन स्पेस सायन्स डेटा सेंटर (ISSDC) येथे साठवली जाईल. ही सर्व माहिती ठराविक काळानंतर सर्वांना खुली केली जाईल. तसेच विशेष लक्षवेधी आणि लोकप्रिय ठरू शकतील अशी छायाचित्रे ISRO च्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द केली जातील.

२३. अॅस्ट्रोसॅटचा इतर भारतीय दुर्बिणींशी काही संबंध असणार आहे का?

– हो नक्कीच! अतिनील आणि क्ष-किरण यांतील विविध तरंगलांबीमधली माहिती खगोलीय वस्तूंच्या स्वरूपाबद्दलची रहस्ये उलगडण्यास मदत करेलच, परंतु या माहितीचा रेडिओ, अवरक्त आणि दृश्य निरीक्षणांशी असलेला संबंध आणखी फायदेशीर ठरेल. अॅस्ट्रोसॅटने एखाद्या नवीन ट्रान्झियंटचा शोध लावला की त्यानंतरची रेडिओ आणि दृश्य प्रकाशात मिळणारी निरीक्षणे ही स्रोताबद्दल जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरतील. याच कारणासाठी अॅस्ट्रोसॅटची माहिती ही पुण्याजवळील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) आणि देवस्थळ, माउंट अबू व हॅन्ले येथील अवरक्त-दृश्य दुर्बिणी तसेच जगभरातील इतर दुर्बिणींशी एकत्रित करून पडताळली जाईल.

२४. भारतासारख्या विकसनशील देशाने अंतराळ दुर्बिणींमध्ये मोठी गुंतवणूक करणे का आवश्यक आहे?

– या प्रश्नाची अनेक उत्तरे देता येतील. जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही मनुष्यात उत्सुकता हा गुण जात्याच असतो आणि ती शमवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. मनुष्यप्राण्याने विचारलेले पहिलेवहिले प्रश्न हे सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि तारे यांबद्दलच असल्याने खगोलविज्ञान हे सर्वांत प्राचीन विज्ञान आहे. त्याच्या अभ्यासाने मनुष्याच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते, आपल्या तुलनेत महाप्रचंड असलेल्या विश्वाची माहिती होते आणि दृष्टीकोन व्यापक होतो. त्यामुळे प्रत्येक देशाने खगोलविज्ञानाची जोपासना केली पाहिजे.
दुसरे म्हणजे इतर क्षमतांबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा विकास करणे विकसनशील देशासाठी आवश्यक ठरते. उच्च ऊर्जा प्रयोग आणि उपग्रह प्रक्षेपणाची भारताची उज्ज्वल परंपरा आहे आणि याच भक्कम पायावर भविष्यातील जागतिक स्तराची प्रयोगसुविधा निर्माण करण्यास अॅस्ट्रोसॅट सज्ज आहे. कल्पनाही न केलेले, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या उपयुक्त असे शोध हे त्यांच्याशी थेट संबंध नसलेल्या मूलभूत विज्ञान संशोधनातून नेहमीच लागतात असे इतिहासात कायमच दिसून आले आहे. उदाहरणार्थ वायरलेस, कॅमेऱ्यात वापरले जाणारे सीसीडी, जीपीएस तसेच वैद्यकीय आणि दळणवळण क्षेत्रात लागलेल्या कित्येक महत्त्वाच्या शोधांचे मूळ खगोलविज्ञानातील संशोधनात आहे. मूलभूत विज्ञान संशोधनात गुंतवणूक करणाऱ्या कोणत्याही देशाला त्याचे बक्षीस हे काही वर्षांनी बहुमूल्य तंत्रज्ञानाच्या रुपात मिळते.
आणि जेथे शैक्षणिक महत्त्वाकांक्षेची कमतरता नाही परंतु उत्तम दर्जाच्या विद्यापीठ स्तरीय विज्ञान शिक्षणाचा अभाव आहे, अशा देशात अॅस्ट्रोसॅट हा विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांच्या कल्पनाशक्तीलाही वाव देणारा आणि उत्साहवर्धक ठरू शकतो. या उत्साहाच्या स्रोताचा ओघ योग्य दिशेला वळवण्याचे कार्य आम्हां सर्वांचे आहे.

२५. शालेय विज्ञान शिक्षणासाठी अॅस्ट्रोसॅटचा लाभ कसा होणार आहे?

– अशी आशा नक्कीच करता येईल! आपण राहतो त्या विश्वाबद्दलच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधणारी जागतिक स्तराची कोणतीही वैज्ञानिक प्रयोगसुविधा विद्यार्थ्यांमध्ये रस निर्माण करू शकते. याची उदाहरणे म्हणजे अमेरिकेच्या चांद्रमोहिमा, व्हॉयेजर मोहीम, लार्ज हॅड्रॉन कोलायडर, जी एम आर टी, चांद्रयान, मंगलयान इत्यादी अनेक… या मोहिमांबद्दल वर्गांमध्ये कुतूहल वाढावे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.
अॅस्ट्रोसॅटकडून मिळालेली सर्व माहिती तसेच त्याच्या विश्लेषणासाठी वापरण्यात आलेले सॉफ्टवेअर इंटरनेटमार्फत सर्वांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल. ही माहिती न्यूट्रॉन तारे, कृष्णविवरे, तप्त युवा तारे, अज्ञात विस्फोट अशांशी निगडित असल्याने त्याबद्दल भरपूर कुतुहल असेलच. ही माहिती विद्यार्थी आणि शिक्षक यांना सहज उपलब्ध व्हावी आणि त्यातून शालेय विज्ञान कळावे यासाठी सोप्या पद्धती निर्माण कराव्या लागतील. आपल्याला याविषयीचे नागरी विज्ञान प्रकल्प निर्माण करता येतील आणि त्यासंबंधी आतापासूनच चर्चा होत आहेत. अॅस्ट्रोसॅट हा भारतीय उपग्रह असल्याने आपल्याला त्याचा जास्तीत जास्त वापर करणे शक्य आहे आणि या संधीचा फायदा घेण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत.

 

Credit :: Translation by Sarang Sahasrabudhe, Jyotirvidya Parisanstha

 

Posted in Uncategorized.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *